ब्राम्हणांचे कसब – प्रस्तावना व सुरुवात...

        ह्या लहानशा चोपडीला मोठी प्रस्तावना लिहीण्याची गरज नाही. आमच्या देशात ब्राम्हणांचे महत्व किती आहे व ते धर्माच्या मिषाने लोकांवर केवढा जुलूम करितात हे प्रसिध्दच आहे , असे असता कोणी म्हणतील की, पुस्तक रचण्याचे कारण काय ? तर त्यास उत्तर आहे की, ब्राम्हण आपला कावा सर्व जातीच्या लोकांसी सारखा चालवीत नाहीत. कुणबी, माळी वगैरे शुद्र लोकांत त्यांचे भटपण फार चालते, आणि ते इतर जातीच्या व विशेषकरून सांप्रत काळच्या सुधारलेल्या लोकांस फारसे ठाऊक नाही. जे विद्या शिकून सुधारले आहेत त्यांच्यामध्ये भटजी बुवांचे महात्म्य दिवसानुदिवस कमी होत चालले आहे; परन्तु अशी गोष्ट शुद्र जातीत नाही. तेथे अद्यापी बाजीरावाच्या वेळेची भटशाई राज्य करीत आहे. अशा लोकांस त्यांच्या बंधनातून सोडवावे म्हणून रा. जोतिबांनी हा प्रयत्न केला आहे . त्यांचा दुसरा एक हेतू हा आहे , की, आमच्या समदृष्टी इंग्लीश सरकारने आपल्या प्रजेतील ह्या अतिउपयोगी वर्गास विद्या शिकवावी व तिच्या योगे त्यांचे डोळे उघडून त्यांस भटांच्या दास्यत्वातून मुक्‍त करावे. हे हेतु सिध्दीस गेले असता ग्रंथकर्त्यांचे श्रम सफल होतील.

- B.P.

 सत्ता नऊ खंड || होती अखंड ||
दाहावी तशीच काशीच ||
जपले बहुत एकीस ||

गुणगंभीर || रणामधी शूर ||
नेमिले प्रत्येक खंडास ||
खंडोबा नाव दिले त्यास ||

वीरप्रचंड || उभे मार्तंड ||
मुख्य केले काळबैहिरिस ||
वागवी नऊ खंडोबास ||

देश आभंड || सुभे उदंड ||
योजिले पाहून ख़ाशास ||
मानिती सर्व नवलोबास ||

मुख्य माहा सुभा || पाठिशी उभा ||
कमी नाही खबरदारीस ||
दुय्यम काळबैहिरीस ||

न्याय चौकशी || सोपी सुज्ञाशी ||
नेमिले बहुत मदतनीस ||
मुख्य नवखंडच्या न्यायास ||

अनेक पायदळ || घोड्याचे बळ ||
कमी नाही तिरंदाजांस ||
भिडविले भाले खांद्यास ||

राजनितीने || लढति शरतिने ||
झोंबती मल्ल ते युध्दास ||
जपले बहुत एकिस ||१||

 

मुख्य पानावर | साहित्य