दुष्काळ विषयक विनंतिपत्रक

        मेहेरबान पुणे मुंबई वगैरे सभासद यांस वि. वि. समाजाचे हुकुमावरून आपणांस असे कळविण्यात येते की, समाजाचे मार्फत 'व्हिक्टोरीया बालश्रम' स्थापन केले आहे. घरांत दुष्काळपिडीत लोक आपली मुले सोडून जाऊ लागले आहेत, व त्याप्रमाणे इंदापुर व मिरज व तासगावांतील ब्राम्हणजातखेरीज करून बाकी सर्व जातीतील कित्येक अनाथ लोक आपली अनाथ मुले घेऊन जमली आहेत. कधीकधी दोन-दोन तीन-तीन दिवसांचे उपवास काढून त्यांची हाडे मात्र उरली आहेत. शिवाय त्यांचे वस्त्रांवाचून इतके हाल झाले आहेत की, त्याचे येथे इत्थंभूत वर्णन करण्यास मला दु:ख वाटते. यावरून आपण सर्व सभासदांनी व इतर दयावंत गृहस्थांनी कृपाळू होऊन, आपल्या शक्‍तीनुसार काही ना काही तरी, ही जाहीरात पाहताच, मदत पाठविण्याचि त्वरा केल्यास आपण आपले कर्तव्य कर्म अशा वेळी बजावल्याचे श्रेय होणार आहे.

ता. माहे मे, सन १८७७ इ.,
आपला सेवक,
जोतिराव गोविंदराव फुले,
स. शो. स. चिटणीस

(ज्ञानप्रकाश, २४ मे १८७७ वरून )

 

मुख्य पानावर | साहित्य