Mahatma Phuleमहात्मा जोतीराव गोविंदराव फुले (१८२७-१८९०) हे १९ व्या शतकाच्या पूर्वाधात उदयाला आलेले शेवटले पण सर्वात पराक्रमी सुधारक ! लोकहितवादींप्रमाणे त्यांचेही घराणे, फुलमाळ्यांच्या धंद्यातील कसबामुळे, पेशव्यांचे आश्रीत आणि इनामदार होते. या सुखवस्तू माळी कुटूबांत पुण्यानजीक त्यांचा जन्म झाला. १८३४ पासून १८४७ पर्यंत पहिली १३ वर्षे त्यांची शिक्षण घेण्यात गेली. या कालावधीत जे परस्परविरोधी संस्कार त्यांच्यावर झाले त्या संस्कारांनी त्यांची मते बनवली आणि त्यांचे जीवन घडविले.त्यांचे शेजारी गफारबेग मुनशी आणि लिजिटसाहेब या दोघांचा या तरतरीत तडफदार चौकस मुलावर लोभ होता. त्यांच्यापासुन मुस्लिम आणि ख्रिस्ती या दोन धर्माची जी माहिती त्यांना मिळाली, तिच्यामुळे हिंदूधर्मातील अमानुष विषमता आणि नाना प्रकारच्या दुष्ट रुढी यांचे ज्ञान त्यांना तुलनेने होऊन गेले . त्याबरोबरच सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे जे तीन ब्राम्हण विद्यार्थी मित्र त्यांना लाभले, त्यामुळे बायबलपासुन ते थॉमस पेन यांच्या,"राईटस ऑफ मॅन " या क्रांतीकारक ग्रंथापर्यंत इंग्रजी वाङमयाचा व्यासंग म्हटले की, “विद्यार्थी असतानाच आमची हिंदूधर्मावरील श्रध्दा उडून ख्रिस्तीधर्माकडे वळाली.पण प्रत्येक धर्मात अशी काही तत्वे आहेत, त्यांचेच आपण अनुकरण करावे.” असे या चार जिज्ञासू तरुणांना वाटल्यामुळे, त्यांना ख्रिस्ती होण्याच नाद अखेर सोडून दिला. या सत्यशोधक समाजाचे बीज आहे. त्याप्रमाणे, वासुदेव बळवंत फडके यांना शस्त्रविद्येचे शिक्ष्ण देणारे त्यांचे मांग जातीतील गुरुजी लहूजीबाबा यांच्या तालमीत असताना "दयाळू इंग्रज सरकारला पालथे घालण्याकरीता", दांडपट्टीची आणि निशान मारण्याची कसरत केल्याबद्दल जो पस्तावा त्यांनी "गुलामगिरी" या पुस्तकात व्यक्‍त केलेला आहे, त्यावरुन विद्यार्थीदशेत असताना राज्यक्रांतीच्या कल्पनाही त्यांच्या डोक्यात या सुमारास येऊन गेल्याचे कळते. पण त्यात नवल नाही. कारण १८२६ उमाजी नाईकांच्या दंग्यापासून तो १८४८ मधील राघोजी भांग्रे यांच्या दंग्यापर्यंत महाराष्ट्रात त्या वेळी अनेक दंगली होउन गेल्या होत्या. पण धर्मांतराच्या वेडाप्रमाणे हे 'वेडाचार' ही त्यांच्या डोक्यातून लवकरच निघून गेले शिल्लक राहीला फक्‍त थॉमस पेन यांच्या समतेच्या तत्वज्ञानाचा प्रभाव, फ्रेंच आणि अमेरीकन राज्यक्रांतीला कारण झालेल्या समता आणि बंधुता या तत्वांची स्फूर्ती !

        रंजल्यागांजलेल्यांना साहाय्य करणे हा आपला धर्म ते मानीत, म्हणून खुद्द महात्मा गांधीजींनी - जोतीबांना 'खरा महात्मा' असे संबोधले आहे . जोतीराव हीच एक अशी महान तत्वनिष्ठ व्यक्‍ती होऊन गेली की, बोलीत आणि कृतीत त्यांनी विसंगती आणू दिली नाही. प्रत्येक वेळी ते कसाला उतरले आहेत. मानवतेले ते बावनकशी सोने ठरले.

        नैसर्गिक मोहाला बळी पडलेल्या बालविधवांना व त्यांच्या अपत्यांना जाहीर संरक्षण देऊन त्यांनी बालहत्या वाचवली व त्यांच्या संगोपनासाठी आश्रम काढले. त्या आश्रमात २००० बालकांची सोय केली होती. २ वर्षापासून ते १२ वर्षाची पोरे तेथे पोसली जात होती. स्त्रियांना शिक्षण मिळाल्याखेरीज देश शिक्षित व सुसंस्क्रुत होणार नाही, कुटुंबाची सुधारणा होणार नाही, हे जाणून स्त्रियांना शिक्षण देण्याकरीता जोतीरावांनी शाळा काढली. हिंदूस्थानातील ती पहिली शाळा होय. त्यात कोणालाही मज्जाव नव्हता.

        अस्पृशांची शाळाही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात त्यांनीच प्रथम काढली. मुलांना पाणी प्यायला मिळेना म्हणुन स्वत:चा हौद खुला ठेवला. पण शाळेत शिक्षक मिळेनात, म्हणून जोतीरावांनी आपल्याच बायकोला शिकवून तयार केले व शिक्षिका बनवले. पण त्यांनाच दमदाटी देऊन, सावित्रीबाईंची टिंगल करून, दगड मारून शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला ! अर्थात त्यामुळे ते दांपत्य काही डगमगले नाही. तेव्हा त्यांना ठार मारण्याकरीता त्यांच्यावर मारेकरी सुध्दा घालण्यात आले. ते मारेकरी मारण्यासाठी आले असताना जोतिरावांनी त्यांना विचारले,”काय रे बाबा, मी तर तुमच्यासाठी मरतो आहे आणि मला मारून तुमचा काय फायदा ?"त्यावर एक म्हणाला "आम्हाला एक हजाराचे बक्षिस मिळणार आहे ." “मग मारा तर!” म्हणून प्रतिकार न करता ते स्वस्थ बसले. या वाक्याने त्यांचा हृदयपालट झाला व शस्त्र टाकून ते त्यांच्या पायावर पडले. त्याला त्यांनी शिकवले व कुंभार हा पंडीत झाला. हे उदाहरण कोणाही महात्म्याला शोभण्याजोगे आहे . ते रस्त्यावरून जात असताना त्यांना एक शेंबडे - मेकडे गलिच्छ पोर भुकेमुळे रडत असल्याचे दिसले. त्याला त्यांनी जवळ घेतले, त्याला स्वच्छ केले आणि जेवू घातले ही गोष्ट ख्रिस्तप्रभूची आठवण करून देते. केवढे मोठे अंत:करण ! दुष्काळ पडला लोक अन्न – अन्न करू लागले. जोतीरावांनी पुढाकार घेतला आणि स्वत:ची सारी शिल्लक बाहेर काढली आणि शेकडो लोकांना रोज जेवण घातले.

        त्यांनी केवळ सामाजिक व धार्मिक प्रश्नच हाती घेतले होते असे नाही. सर्व समाजातील थरांचा ते विचार करीत होते. मुंबईच्या मजुरांकडेही त्यांची दृष्टी वळली. त्या वेळी मजुरांना १४ तास काम करावे लागे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच अवजद काम करावे लागे. मुलांनाही तेच त्रास होते. जोतीरावांचे सहकारी व अनुयायी लोखंडे यांनी मजुरांचा प्रश्न हाती घेतला. त्यांनी खास मजुरांसाठी पत्र काढले व मजुरसंघटना बनवली. महाराष्ट्रातील हिच पहिली मजुर संघटना होय. त्याचे परिणाम झाले, तास कमी झाले. स्त्रियांना-मुलांना सवलती मिळू लागल्या.

        आश्चर्याची गोष्ट अशी की आजच्या पंचवार्षीक योजनांचा आराखडाही त्यांच्या लिखाणात आढळतो. त्यांची दृष्टी चौफेर फिरत होती ती पल्लेदार होती. ते महान द्रष्टे होते.

        जमिनीला बांध बांधून पाणी आडवावे, म्हणजे जमीन सुपीक होईल. धरणे बांधून नद्या आडवाव्यात. शेतकर्‍यांना कर्जमुक्‍त करावे. कमी रकमा देऊन गरज भागवावी, बी-बीयाणे औते, अवजारे पुरवावीत,उत्कृष्ठ जनावारांची पैदास करावी. उत्तम शेती करणार्‍यांना बक्षिसे द्यावीत. हे सारे विचार त्यांच्या लिखाणात आढळून येतात.खेड्यावरच्या निवडक हुषार मुलांना निवडून त्यांना अखेरपर्यंत शिक्षण मोफत द्यावे या कल्पेनाचाही पुरस्कार जोतीरावांनी केला होता.

        केवळ "लोका सांगे ब्रह्मज्ञान" अशी वागणुक जोतीरावांची नव्हती. समतेचे ते खरे पुरस्कर्ते होते. जातिभेद मोडून काढाण्याचे प्रवचन देऊन ते स्वस्थ बसले नाहीत.

        त्यांनी विवाहबाह्य विधवेच्या मुलाला जवळ केले. त्याला फुले दांपत्याने पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले , त्याचे नाव 'यशवंत' ठेवले . आपल्या इस्टेटितला काही भाग त्याला तोडून दिला व ज्ञानोबा सासने नावाच्या आपल्या मित्राला त्याची मुलगी यशवंतला देण्याविषयी विनंती केली. त्या थोर चेल्याने ती मान्य केली. अशा या खर्‍या थोर पुरुषाला , सर्वधर्मीय मुंबापुरीने सत्कार करून 'महात्मा ' ही पदवी दिली.

        शिवस्मारकाची कल्पना फुल्यांची, पण हे कितीजणांना माहीत आहे ? फुलेच लिहीतात "पुण्यास आलो व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडी जाण्यास निघालो. समाधीची जागा शोधण्यात २/३ दिवस गेले . घाणेरी व इतर जंगली झुडुपे कुर्‍हाडीने तोडीत रस्ता काढावा लागला ...... शिवजन्म उत्सव साजरा करावा, म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुऊन काढून त्यावर फुले वाहिली. ”

        सन १९८८ मध्ये ड्युक ऑफ कॅनॉट पुण्यास आले होते . जोतीरावांचे स्नेही हरी रावजी चिपळूणकर यांनी राजपुत्रासाठी एक मेजवानी आयोजीत केली आणि जोतिरावांना मेजवानीस आमंत्रित केले. जोतीराव मेजवानीस हजर राहीले पण गरिबीत दिवस काढणार्‍या शेतकर्‍याच्या वेषात. त्या प्रसंगी जोतिरावांनी इंग्रजीत भाषण करून शेतकर्‍यांची परिस्थिती कशी हलाखीची आहे ते राजपुत्राला समजावून दिले.

( वरिल सर्व मान्यवरांचे उतारे म. शासन प्रकाशित म. फुले गौरव ग्रंथातून घेतले आहेत.)

मुख्य पानावर