मद्यपानगृहाच्या वाढीस विरोध दर्शविणारे पत्र

(पुण्यातील मद्यपानगृहात वाढ करण्याच्या सरकारी धोरणाला विरोध करणारे हे पत्र महात्मा फुले यांनी पुणे नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष प्लंकेट यांना १८ जुलै १८८० रोजी लिहीले होते)

        “नगरपालिकेने बराच पैसा खर्च लोकांचे आरोग्य सांभाळण्याच्या उद्देशाने बराच मोठा नोकरवर्ग नेमला आहे. लोकांचे आरोग्य सांभाळण्याचे दृष्टीने तसे एक खातेसुध्दा ती चालवीत आहे . तथापी ज्या पुणे शहराला दारूचे गुत्ते परिचित नव्हते, त्यात आता भरवस्तीत दारुचे गुत्ते उघडल्यामुळे लोकांच्या नैतिक अध:पाताची सर्व बीजे पेरली जात आहे. त्यामुळे शहराचे आरोग्य सांभाळणे हा जो नगरपालिकेचा एक उद्देश आहे त्याला बाधा येत आहे ”

        “दारुचे व्यसन हे नागरिकांच्या नैतिक आचरणाला बाधक आहे; एवढेच नव्हे, तर त्यांच्या आरोग्यालाही अतिशय अपायकारक आहे, हे माझे म्हणणे बहुतेक लोक आपखुषीने मान्य करतील. दारूचे गुत्ते शहरात उघडल्यापासून दारुबाजी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की, त्यामुळे अनेक कुटुंबांचा संपूर्ण नाश झाला आणि ह्या दुर्गुणाला आता शहरात सराईतपणा आला आहे.”

        “ह्या व्यसनाच्या प्रसाराला काही प्रमाणात तरी आळा बसावा, म्हणून नगरपालिकेला अशी सूचना करतो की, नगरपालिकेने या दारुगुत्त्यांवर ते ज्या प्रमाणात हानी करतात, त्या प्रमाणात कर बसवावा. मला असे कळले की, कुठल्याही नगरपालिकेने अशा गुत्त्यांवर कर बसविलेला नाही ; मात्र त्यांच्यावर मध्यवर्ती सरकारचा कर असतो. या बाबतीत आवश्यक तर नगरपालिकेने चौकशी करावी. माझा हा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवल्यास मी आपला आभारी होईन.”


(धनंजय कीर, महात्मा जोतीराव फुले, मुंबई, १९६८, प्रु. १८४ ते १८६ )

मुख्य पानावर | साहित्य