हा धन्य जोतीबा झाला !

 

सत्याचा पालनवाला | हा धन्य जोतीबा झाला
पतितांचा पालनवाला | हा धन्य जोतीबा झाला
जन्माचा मालाकार कर्माची खडी तलवार
त्या समान कोण तो बोला | हा धन्य जोतीबा झाला ||१||

बोलिचा रोखडा मेख | चालीचा कणखर रेख
सत्याअचा पाठीराखा | धर्माचा की जिव्हाळा
धन्य धन्य जोती फुलारी
दिनदुबळ्यांचा कैवारी
किती वानू त्याची लिला | हा धन्य जोतीबा झाला ||२||

किती झाले जे छळ सगळे | परि हासुनि ते गिळियले
लोकभ्रम निर्दाळीले | वर्णाश्रम केला ऊजळा
कुणी शिकून शहाणे ठरले
कुणी विकून पुढारी बनले
कुणी भिकून महात्मा झाले
सच्चा हा सेवक आगळा | हा धन्य जोतीबा झाला ||३||

वेदांनी देव चोरीयला | बुव्वांनी धर्म बाटविला
शहाण्यांशी संशयो झाला | मग धन्य जोति उदेला
महाराष्ट्र हा ज्ञानेशाचा
महाराष्ट्र हा तुक्याचा
जोतिबा हा लोकांचा
परि सगळा सेवकविरळा | महाराष्ट्र सुधारक आगळा || ४ ||

- महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (महात्मा फुले गौरव ग्रंथ)

मुख्य पानावर