सत्त्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी प्रारंभ

||मंगलाष्टक ||


(वर)
देवाचे नियमा प्रमाण धरूनी, चाले तुझे कूल गे ||
सत्याने अवघ्यांत श्रेष्ठ असशी, तैसेच ही त्वत्सगे ||
अज्ञान्या समदृष्टीने शिकवीशी, तू ज्ञान त्या दावशी ||
प्रीतीने वरितों तुला आजि, तुझी किर्ती अशी ||
शुभमंगल सावधान ||१||

(वधू)
मानीशी जरी त्वा दिले अनुदिनी, कर्त्या समाधानसे ||
आम्हा सर्व स्त्रियां असे बहु पिडा, हे नेणशी तूं कसे ||
स्वातंत्र्यानुभवाची ओळख अम्हां, झाली नसे मानसी ||
यासाठी अधिकार देशिल स्त्रियां, घे आण त्याची अशी ||
शुभमंगल सावधान ||२||

(वर)
स्थापया अधिकार मी झटतसे, या बायकांचे सदा ||
खर्चाया न मनी मी भी किमपिही, सर्वस्व माझे कदा ||
मानीतो सकल स्त्रियांस बहिणी, तू एकली मत्प्रिया ||
कर्त्याचे भय मी मनात तुजला, ठेवीन पोसावया ||
शुभमंगल सावधान ||३||

(वधू)
बंधुत्व मजला समस्त असती, त्वभिदन्न करी नर ||
आज्ञाभंग तुझ्या करीन न कदां, मी सत्या कर्त्यावर ||
ठेवोनी अवघाची भार झटुंया , लोकांत कराया हित ||
हाताला धरूनी तुला वरितसे, सर्वांपुढे मी आता ||
शुभमंगल सावधान ||४||


(सर्वस्त्रिपुरूषांनी म्हणावयाचे मंगलाष्टक )
आभारा बहू मानिजे आपुलिया, मातापित्यांचे सदा ||
मित्रांचे तुमच्या तसेच असती, जे इष्ट त्यांचे वदा ||
वृध्दा पंगु सहाय्य द्या मुलीमुला, विद्या तया शिकवा ||
हर्षे वृष्टी करा फुलांची अवघे, टाळी आता वाजवा ||
शुभमंगल सावधान ||५||

आशिर्वाद

वधुवरा या बहु शक्‍ती द्याया |
समर्थ तो जोची करी जगा या ||
सुबुध्दी, विद्या, बल आणी भूती |
दया तयाच्याचि कृपे करोति ||
मनी स्वकर्त्या दृढ चिंतुनी हो |
बळी कूळस्वामी आठवा हो ||
तशीच विंद्यावलि स्वामिणीला |
स्मरा तसा काळ भैरवाला ||
खंडेरावा पाहिजे आठविला |
तैसातुम्ही त्याहि महासुभ्याला ||
न्यायाकरता जो नऊ खंडचा हो |
याशी स्मरता सुख तुम्हा बहु हो ||

पूजा

सत्यमेव जयते

आकाशनिर्माणकर्ते नमः, तेजनिर्माणकर्ते नमः, वायुनिर्माणकर्ते नमः, उदकनिर्माणकर्ते नमः, पृथ्वीनिर्माणकर्ते नमः, सूर्यनिर्माणकर्ते नमः, चंद्रनिर्माणकर्ते नमः, तारांगणनिर्माणकर्ते नमः, मयुरनिर्माणकर्ते नमः, मर्कटनिर्माणकर्ते नमः, अनुरेणुनिर्माणकर्ते नमः, पर्जन्यनिर्माणकर्ते नमः, सागरनिर्माणकर्ते नमः, कच्छनिर्माणकर्ते नमः,मत्स्यनिर्माणकर्ते नमः,जलजंतुनिर्माणकर्ते नमः, वटव्रुक्षनिर्माणकर्ते नमः, चंदननिर्माणकर्ते नमः,तुलशीनिर्माणकर्ते नमः,कंदमूलनिर्माणकर्ते नमः,वेलीनिर्माणकर्ते नमः, सुगंधनिर्माणकर्ते नमः, पुष्पनिर्माणकर्ते नमः, फलनिर्माणकर्ते नमः, पिपीलिकानिर्माणकर्ते नमः, गजेन्द्रनिर्माणकर्ते नमः, अश्वनिर्माणकर्ते नमः, किटकनिर्माणकर्ते नमः, बुध्दिमाननिर्माणकर्ते नमः, स्पर्शेंद्रियनिर्माणकर्ते नमः, कर्णेंद्रियनिर्माणकर्ते नमः, चक्षुरिंद्रियनिर्माणकर्ते नमः, रसनेंद्रियनिर्माणकर्ते नमः, घ्राणेंद्रियनिर्माणकर्ते नमः, ज्ञानेंद्रियनिर्माणकर्ते नमः,शुध्दविचारनिर्माणकर्ते नमः, कुळस्वामिनीनिर्माणकर्ते नमः, महाबळीराजानिर्माणकर्ते नमः, महाजोतीबानिर्माणकर्ते नमः, काळबहिरीनिर्माणकर्ते नमः, महाखंडेरावनिर्माणकर्ते नमः, नवखंडचान्यायीनिर्माणकर्ते नमः, महासुभानिर्माणकर्ते नमः, सप्ताश्रयनिर्माणकर्ते नमः, ब्रम्हराक्षसनिर्दाळनिर्माणकर्ते नमः

स्नानं समर्पयामी, पंचमतस्नानं समर्पयामी, सुगंधादिकस्नानं समर्पयामी, चंदनं विलेपनं समर्पयामी, अक्षतां समर्पयामी, पुष्पं समर्पयामी, धूपं समर्पयामी, नैवेद्यं समर्पयामी, दक्षिणां समर्पयामी, तांबुलं समर्पयामी, शुद्रविव्दानाय दक्षिणां समर्पयामी

शपथ (वर)

आजपासून मी तुला माझी भार्या कबूल करून, जातपंचासमक्ष मी प्रतिज्ञा करितो, ती अशी की, आजपासून मी तुला या सूतभर मर्यादेइतकी देखील जागा सोडून तुझ्याबाहेर जाणार नाही, म्हणून आपल्या उत्पन्नकर्त्यासहीत कुळस्वामीस स्मरून प्रतिज्ञा करितो.

शपथ (वधू)

आजपासून मी तुला माझा भ्रतार कबूल करून, जातपंचासमक्ष मी प्रतिज्ञा करिते, ती अशी की, आजपासून मी तुला या सूतभर मर्यादेइतकी देखील जागा सोडून तुझ्याबाहेर जाणार नाही, म्हणून आपल्या उत्पन्नकर्त्यासहीत कुळस्वामीस स्मरून प्रतिज्ञा करिते.

आरती

जय जय हो माझ्या आदिसत्या
तुझ्या सत्तेने शोधू उत्पन्नकर्त्या || ध्रू ||
विजयी द्विज होता क्षेत्री निषेधीले
विद्या बंद करोनी क्षुद्रवत केले
आर्यांनी शुद्राला पशुतुल्य केले
भुदेव होऊनी पाय पूजविले
अहंब्रम्ह होऊनी भोंदिती मूढाला
नाही भित कधी साद्विकेला
ब्राम्हणभोजन चंगळ करविती
ब्रम्हराक्षसाला मागे हटविती
म्रुतांच्या नावानी दानधर्म घेती
अघम होऊनी मधीच खाती
खाऊ दिले नाही श्रमीक शुद्राला
अंधपंगूसह पोरक्या पोराला
सत्योदय होता खुंटे वेदमति
पाहू जाता अवघी दिसे खोटी स्मृती
सत्या तुझा महिमा पुराणे ऐकुनी
तोंडे करिती काळी तेलमाखमणानी
तुला पाहुनी कुंठीत होती पाखंडी
लज्जित होऊनी खाली घालती मुंढी
कृपा तुझी होता मुढ जनावर
भूदेव कापती मनी थरथर
कृपेचा सागर बां तू सत्य जाण
मुक्‍त केले आम्हाब्रम्हपाशांतून
तुझ्या प्रसादाने मार्ग उमजलो
मातापित्या आम्ही सेवू लागलो ||१||
जयहो जयहो माझ्या आदिसत्या
तुझ्या सत्येने शोधू उत्पन्नकर्त्या ||

सेवु या सत्यराजा || महाप्रांजळ तेजा ||
शोधिती निर्वाणी || मन वेंधले का राजा || ध्रु ||
लोपले सत्य जनी || हित नेणती कोणी ||
धर्म रचिले बहू || आपहीत साधूनी ||१||
शोधिता सत्यवर्मा || पावलो गूज मर्मा ||
विटलो खोट्या धर्मा || त्यागिले नीच कर्मा ||२||

देवा नित्य स्मरुनी, धर सत्य मताला
खोटा धर्म सोडूनी, जोड बंधूप्रीतीला
अहंब्रम्ह होऊनी, त्यागू नको दीनाला
सोंवळा रे बनूनी, चढू नको मदाला
इडापिडा मर्दूनी, सेव सत्य राजाला
स्वतः श्रम करूनी, पोस स्वकुटूंबाला
सदा सत्य वदूनी, सोड धूर्त मताला
विद्या क्षुद्रा देऊनी, आर्पी ईश्वराला
भंड मत खोडूनी, जोती नमे ईशाला ||ध्रू||

मुख्य पानावर | साहित्य