शेतकर्‍याचा आसूड - उपोद्घात

विद्येविना मति गेली; मतीविना नीती गेली; नीतीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले; वित्तविना शुद्र गेले; इतके अन एका अविद्येने केले ||

        वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुध्द शेतकरी आथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असतां, मुळचे जे लोक शुध्द शेतीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले, ते माळी व जे दोन्हीही करून मेंढरे, बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले, ते धनगर. असे निरनिराळ्या कामावरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतू आता या तीन पृथक जातीच मानतात. याचा सांप्रत आपसात फक्‍त बेटी व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादी सर्व काही होते. यावरून हे (कुणबी, माळी, धनगर) पूर्वी एकाच शूद्र शेतकरी जातीचे असावेत. आता पुढे या तिन्ही जातीतले लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरूपायाने सोडून उदरनिर्वाहास्तव नाना तर्‍हेचे धंदे करू लागले. ज्याजवळ थोडेबहूत अवसान आहे ते आपली शेती सांभाळून राहतात व बहूतेक अक्षरशून्य देवभोळे, उघडेनागडे व भुकेकंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यात बिलकुल थारा नाही, ते देश सोडून जिकडे तिकडे चरितार्थ चालला तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करून लागले, कोणी लाकडांचा व कोणी कापडाचा, तसेच कोणी कंत्राटे व कोणी रायटरीची वगैरे नोकर्‍या करून शेवटी पेन्शने घेऊन डौल मारीत असतात. अशा रितीने पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवितात, परंतू त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुले, ज्यांस विद्येची गोडीच नाही अशी, त्यांची थोड्याच काळात बाबूके भाई दरवेशी होऊन वडीलांचे नावाने पोटासाठी दोम दोम करीत फिरतात. कित्येकांच्या पूर्वजांनी शिपायीगिरीच्या व शहाणपणाच्या जोरावर जहागिरी, ईनामे वगैरे कमाविली, व कित्येक शिंदे-होळकरांसारखे प्रतिराजेच होऊन गेले. परंतू हल्ली त्यांचे वंशज अज्ञानी अक्षरशून्य असल्यामुळे आपआपल्या जहागिरी, इनामे गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत्साते कित्येक तर अन्नासही मोताद झाले आहेत. बहुतेक इनामदार जहागिरदारास आपल्या पूर्वजांनी काय काय पराक्रम केले, कस कशी संकटे भोगिली याची मनात न येता, ते ऐत्या पिठावर रेघा ओढून अशिक्षित असल्यामुळे दुष्ट व लुच्चे लोकांचे संगतीने रात्रंदिवस ऐषआरामात व व्यसनात गुंग होऊन, ज्यांच्या जहागिरी गहाण पडल्या नाहीत अथवा ज्यांस कर्जाने व्याप्त केले नाही, असे विरळाच.

 

मुख्य पानावर | साहित्य