पतीविषयी

अडाणी जनांचा असे कर्णधार
त्यांना ते असे देवाचे सविचार
कृतीवीर होता तसा ज्ञानयोगी
स्त्रीचा शुद्रासाठी सदा दु:ख भोगी

जयामुळे मी कविता रचिते
जयाचे कॄपे ब्रम्ह आनंद चित्रे
जयाने बुध्दि मिळे सावित्रीस
प्रणाम करिते स्वामी ज्योतीबास

सुंदर सॄष्टी सुंदर मानव
सुंदर जीवन सार
सदभावनाच्या पर्जन्याने
बहरून हाक बारे

तयास मानव म्हणावे का ?

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव का म्हणावे ?||१||

दे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव का म्हणावे ? ||२||

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव का म्हणावे ? ||३||

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव का म्हणावे ? ||४||

पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वानाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव का म्हणावे ?||५ ||

मुख्य पानावर